शेख महंमद महाराजांचा पालखी सोहळा हा आनंद सोहळाः बापूसाहेब डोके
चापडगाव (प्रतिनिधी) संत शेख महंमद महाराजांचा पालखी सोहळा हा खूप मोठा आनंद सोहळा आहे. शेख महंमद महाराजानंतर या सोहळ्याचे प्रथमच चारशे वर्षानंतर आयोजन करण्यात आले. सोहळ्या मध्ये उत्तरोत्तर वाढ होवो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस बापूसाहेब डोके यांनी केले.
संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानच्या वतिने श्रीक्षेत्र वाहिरा ते श्री क्षेत्र पंढरपूर पालखी सोहळ्यास भेटीदरम्यान ते बोलत होते.
पुढे बोलता श्री. डोके म्हणाले की, शांती, समता, बंधुता, एकात्मता, यांची शिकवण देणारे संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांचा पालखी सोहळा हा प्रथम वर्षी सुरू केला आहे. या सोहळ्यास पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रतिष्ठानने राबवलेल्या वृक्षारोपण, स्त्री पुरुष समानता, सामाजिक सद्भाव, धार्मिक ऐक्य, या उपक्रमांचे बापूसाहेब डोके यांनी भरभरून कौतुक केले.
यावेळी बापूसाहेब डोके यांनी शेख महंमद महाराजांच्या प्रतिमेची सहकुटुंब पूजा करून महाराजांचा श्वेत ध्वज घेऊन दिंडीचा एक टप्पा पूर्ण केला आणि वारीचा आनंद घेतला. यावेळी पुढील वारीसाठी वारकऱ्यांना शुभेच्छा देऊन देणगी स्वरूपात भरघोस आर्थिक मदतही केली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. सोमनाथ महाराज मेटे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. सिद्धनाथ मेटे महाराज, सचिव ह.भ.प. किसन आटोळे सर, सोमनाथ शेलार सर यांच्याशी वारीबद्दल चर्चा केली व दिंडी आयोजकांचे वारकऱ्यांचे भरभरून कौतुक केले. सर्व वारकऱ्यांच्या वतीने बापूसाहेब डोके यांचा शेख महंमद महाराजांचा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.